स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक कारवाई
नांदेड, प्रतिनिधी : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यात विशेष पोलीस पथक रवाना केले होते. या पथकाने 11 ऑगस्ट 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत एकूण 27 आरोपींवर कारवाई केली असून 17 लाख 84 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती हॉस्पिटलजवळ जाणारे रोडवर राजे बार अँड रेस्टॉरंटसमोर टीन शेडमध्ये मटका बुक्कीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 हजार 610 रुपयांची रोकड आणि 19 हजार रुपयांचे तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 396/2026, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयटी कॉलेजजवळ नवीन रेणापूर नाका परिसरात योगेश बनसोडे यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण नावाच्या मटका बुक्कीवर कारवाई करण्यात आली. येथे 19 हजार 350 रुपयांची रोकड आणि 42 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईत नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनसोडे यांच्या शेतातील टीन शेडमध्ये जुगार खेळणाऱ्यांवरही पथकाने कारवाई केली. या कारवाईत 37 हजार 320 रुपयांची रोकड, 12 मोबाईल, दोन चारचाकी वाहने आणि पाच मोटारसायकली असा एकूण 16 लाख 91 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात 12 जणांना ताब्यात घेऊन अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 540/2026, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तीनही कारवायांमध्ये एकूण 27 आरोपींवर कारवाई, 69 हजार 280 रुपयांची रोकड, 20 मोबाईल आणि इतर वाहने व साहित्य असा एकूण 17 लाख 84 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईत पोलीस उपअधीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसळे, गणेश राठोड, संदीप वायबाड आणि गजानन उबरे यांनी सहभाग घेतला. पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.
दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील मटका, जुगार किंवा इतर अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 9150100100 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला असून, नागरिकांनी या हेल्पलाइनवर माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असून, नागरिकांनी निर्भयपणे अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
