स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर, दि. १२ ऑगस्ट २०२६ : नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करणे, तसेच पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ करून लोकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढविण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी ‘जनसंवाद’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या तक्रारी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांशी दर महिन्याला थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेणे, त्यामागील अडचणी समजून घेणे आणि संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी आवश्यक त्या सूचना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.


बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ४५ तक्रारदारांनी आपल्या तक्रारींचे लेखी अर्ज पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सादर केले.


या तक्रारींमध्ये मालमत्तेशी संबंधित वाद, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय तसेच इतर विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. प्रत्येक तक्रारदाराची समस्या समजून घेत संबंधित तक्रारीची माहिती घेण्यात आली. तसेच तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पाठपुरावा प्रभावीपणे व्हावा आणि तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती मिळावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयामार्फत ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींचे संबंधित पोलीस ठाणे व अधिकाऱ्यांकडून निराकरण करण्यात येत आहे.


‘जनसंवाद’ उपक्रमाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्यांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयाकडून घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीबाबत अभिप्राय देण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


या उपक्रमासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. भोसले चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.


नागरिकांच्या समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ‘जनसंवाद’ उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *