स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी; चालक व अटेंडन्स दीदींना सुरक्षेबाबत मार्गदर्शन.
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि वाहतूक नियमांनुसार व्हावा, यासाठी मा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा वाहतूक शाखेकडून विविध शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन व पाहणी उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज RTO विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोद्दार शाळेत संयुक्त भेट देऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. वाहनचालक तसेच विद्यार्थ्यांसोबत असलेल्या अटेंडन्स दीदींना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना वाहनात बसविताना व वाहनातून उतरताना विशेष काळजी घेणे, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक न करणे, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या भेटीचा मुख्य उद्देश शाळा व्यवस्थापन, वाहनचालक, अटेंडन्स आणि पालक यांच्यामध्ये विद्यार्थी वाहतूक सुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची माहिती देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
शालेय विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असून, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ पोलिसांची किंवा शाळेची नसून पालक, शाळा व्यवस्थापन, वाहनचालक, अटेंडन्स आणि संबंधित सर्व यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. या भावनेतून लातूर पोलीस विभागाकडून शाळांशी समन्वय साधत सकारात्मक पद्धतीने सुरक्षा मार्गदर्शन केले जात आहे.पोद्दार शाळेतील ही भेट विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शन आणि समन्वयाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापन, शिक्षक, वाहनचालक व अटेंडन्स यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
“विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता” या भूमिकेतून लातूर पोलीस विभागाकडून विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेबाबत नियमित मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व संबंधितांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
