नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
दौंड तालुक्यातील डाळिंब येथील एका २५ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी यवत पोलिसांनी गंभीर कारवाई करत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना ताब्यात घेतले आहे. वैष्णवी अजिंक्य कांबळे असे मृत विवाहितेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळींसह इतरांवर शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत श्रीमती आशा संतोष साबळे (वय ४५, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी या मृत वैष्णवीच्या आई आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२२ ते ९ जून २०२६ या कालावधीत डाळिंब (ता. दौंड) येथे आरोपींनी संगनमत करून वैष्णवी कांबळे हिला वारंवार उपाशी ठेवणे, हाताने मारहाण करणे तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करणे असे प्रकार केल्याचा आरोप आहे. या सातत्यपूर्ण छळामुळे वैष्णवी हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अजिंक्य भाऊसो कांबळे, भाऊसो कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, शेखर भोसले, स्वप्नील भाऊसो कांबळे (सर्व रा. डाळिंब, ता. दौंड) तसेच सूर्यकांत कदम (रा. उरुळी कांचन, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अजिंक्य कांबळे, स्वप्नील कांबळे आणि सूर्यकांत कदम यांना १० जून २०२६ रोजी तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे डाळिंब परिसरात खळबळ उडाली असून विवाहितेच्या मृत्यूमागील नेमकी कारणे आणि इतर आरोपींची भूमिका याबाबत यवत पोलीस सखोल तपास करत आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिस हवालदार करे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. विवाहितेच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य तपासातून समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
