संदिप रोमण ( जेजुरी प्रतिनिधी )

पुरंदर, जेजुरी : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी दररोज राज्यासह देश-विदेशातून हजारो भाविक जेजुरी येथे येतात. मात्र, रविवारी देवदर्शनासाठी आलेल्या एका भाविकास देवसंस्थानच्या खाजगी सुरक्षा रक्षकाकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जेजुरी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील रहिवासी आकाश कैलास शेटे (वय 26, व्यवसाय – नोकरी) हे खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आले होते. यावेळी जेजुरी खंडोबा गडाच्या पूर्व दरवाजाजवळ देवसंस्थानचा खाजगी सुरक्षा रक्षक मच्छिंद्र दोडके (रा. जेजुरी) याने भाविक आकाश शेटे यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत, “गडावरून लवकर खाली निघून जा,” अशी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाविक आकाश शेटे यांनी, “मी गडावर दर्शनासाठी जात आहे,” असे सांगितले असता, सुरक्षा रक्षक मच्छिंद्र दोडके याने आपल्या हातातील फायबर काठीने आकाश शेटे यांच्यावर जोरदार हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या नाकावर, तोंडाच्या जबड्यावर, डाव्या हातावर तसेच उजव्या पायावर गंभीर आघात झाले. या हल्ल्यात नाकाचे व जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून, उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.

इतकेच नव्हे, तर “तू गडावरून लगेच निघून जा, नाहीतर तुला जिवंत मारतो,” अशी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप भाविकाने केला आहे. या घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या आकाश शेटे यांनी थेट जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून जेजुरी देवसंस्थानच्या खाजगी सुरक्षा रक्षक मच्छिंद्र दोडके याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 408/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा सहाय्यक फौजदार कारंडे यांनी नोंदवला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार पिंगळे हे पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

दरम्यान, या गंभीर घटनेबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दि. 15 डिसेंबर रोजी जेजुरी मार्तंड देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे यांच्याशी दूरध्वनीद्वारे तीन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे देवसंस्थान प्रशासनाची भूमिका काय, याबाबत संभ्रम कायम आहे.

खंडोबा गडावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनच अशा प्रकारची मारहाण होत असल्याने, भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवसंस्थान प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed