चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
जत ( जि.सांगली )समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत मार्ग काढणारे डॉ. शिवाजी खिलारे यांनी समाजकारणात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. जिल्हा परिषद कुंभारी गटातील प्रत्येक गावात प्रत्यक्ष संपर्क ठेवत गरीब, वंचित व दुर्लक्षित नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. स्वतः डॉक्टर असूनही समाजकारणात अग्रेसर राहून ना जात ना धर्म मानता सर्व समाजघटकांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
याच सामाजिक व शैक्षणिक जाणीवेतून डॉ. शिवाजी खिलारे यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांचे “पालक आणि विद्यार्थी सुसंवाद” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बदलत्या काळात पालक व विद्यार्थ्यांमधील संवाद दृढ होणे आवश्यक असून या व्याख्यानातून पालक, विद्यार्थी व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. श्रीमंत इंद्रजितराजे उदयसिंहराव डफळे भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अजयकुमार नष्ठे (उपविभागीय अधिकारी, जत), श्री. सचिन थोरबोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, जत) आणि श्री. प्रवीण धनोरकर (तहसीलदार, जत) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमंत सौ. उर्वशीराजे इंद्रजित डफळे (अध्यक्ष, जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, जत) व मा. श्री. राजेंद्र मलकनगौडा पाटील (उपाध्यक्ष, जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, जत) हे लाभणार आहेत.
हा कार्यक्रम सोमवार, दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 1.30 वाजता श्रीमंत विजयसिंहराजे रामराम डफळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शेंगाव (ता. जत) येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास एस. व्ही. आर. डी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शेंगाव यांचे प्राचार्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
