पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
पुणे : दि. २३ : जुन्नर तालुक्यातील करंजाळे येथे शुक्रवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड करत हॉटेल मालकासह तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंजाळे येथील ‘हॉटेल लेक’चे मालक रंजीत रवींद्र शिंदे (वय ३०, रा. करंजाळे, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवार दि. २२ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भाऊ अरुण शिंदे व आई पार्वती शिंदे यांच्यासह हॉटेलमध्ये काम करत होते.
त्यावेळी महेंद्र पोपट गायकवाड, शैलेश जगन्नाथ गायकवाड, राजू गायकवाड (रा. सितेवाडी, ता. जुन्नर) व इतर तीन अनोळखी व्यक्ती हॉटेलमध्ये आल्या.
फिर्यादीनुसार, “तुम्ही गौतम लोखंडे यांना मारता काय, आता तुम्हाला दाखवतो,” असे म्हणत संबंधितांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी व कुटुंबीयांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी हातातील काठ्या, दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी तिघांनाही मारहाण केली.
यावेळी आरोपींनी लोखंडी रॉड व चाकू दाखवत “तुम्हाला संपवून टाकतो,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच हॉटेलमधील कॅश काऊंटर, प्लास्टिकच्या टेबल-खुर्च्या यांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. मारामारीदरम्यान रंजीत शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
या हल्ल्यात रंजीत शिंदे, त्यांचे भाऊ अरुण शिंदे व आई पार्वती शिंदे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार भारती भवारी करत आहेत.
