नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो. नं. : 70281 92140
यवत, ता. दौंड : विनापरवाना गावठी पिस्तूलाचा धाक दाखवत चौफुला परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना यवत पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौफुला परिसरात दोन इसम गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून नागरिकांना धमकावत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सोमनाथ छगन माने (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) आणि पवन कलरू वर्मा (वय २५, रा. पिंपळवंडी रोड, उक्कली कान्हे, ता. हवेली, जि. पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली.
याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांखाली तसेच शस्त्र अधिनियमाच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात हे दोन्ही आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरार झाले असल्याचे समोर आले. त्यांचा शोध घेण्यासाठी यवत पोलिसांनी विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी छापेमारी केली. अखेर तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात यश आले.
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे न्यायालयीन प्रक्रियेसाठी ताब्यात घेतले असून या शस्त्रांचा वापर अन्य कोणत्या गुन्ह्यात झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी परिसरात निर्माण केलेल्या दहशतीबाबत अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघमारे तसेच पोलीस अंमलदारांचा समावेश होता.
यवत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वापरणे किंवा अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
