नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
यवत : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. दिनांक 15 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते 24 जून 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून, याबाबत यवत पोलीस स्टेशनकडून वाहतूकदार आणि नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व अवजड मालवाहू वाहनांना पुणे शहरामध्ये प्रवेशास बंदी असेल.
त्यामुळे सर्व ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी आणि अवजड वाहन चालकांनी केडगाव चौफुला – न्हावरे – तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर – चाकण – मुंबई या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, केडगाव चौफुला येथून पुणे दिशेकडे फक्त कार, जीप, टेम्पो आणि इतर हलक्या वाहनांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे अवजड वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
वाहतूक व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी सोलापूर–पुणे महामार्गावरील डाव्या लेनचा वापर अवजड वाहनांसाठी, तर उजव्या लेनचा वापर इतर हलक्या वाहनांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यवत पोलीस स्टेशनने सर्व ट्रान्सपोर्ट व्यवसायिक, वाहन चालक आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली आहे. आगामी काही दिवसांत या मार्गांवर विशेष वाहतूक नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करूनच मार्गस्थ व्हावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
