फिरोज सय्यद  ( नांदेड जिल्हा प्रतिनिधी )

नांदेड : जागतिक मानव तस्करीविरोधी दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने ३० जुलै २०२६ रोजी स्थानिक महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. नीलम गोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांमध्ये मानव तस्करीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच स्वतःचे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक माहिती देणे हा होता.

कार्यक्रमात मानव तस्करी म्हणजे काय, तिचे विविध प्रकार, फसवणुकीच्या पद्धती, सोशल मीडियाद्वारे होणारे आमिष, रोजगार व शिक्षणाच्या नावाखाली होणारी फसवणूक, महिलांना व तरुणांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांच्या कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संशयास्पद हालचाली किंवा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अटक (Digital Arrest), UPI आणि QR कोडद्वारे होणारे घोटाळे, OTP, CVV तसेच बँकिंगची गोपनीय माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्यासह कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत मानव तस्करी आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला अनिता गावकवाड (महिला पोलीस उपनिरीक्षक), सचिन सावनोजे (पोलीस उपनिरीक्षक), मोनिका बिरादार (समुपदेशक), एम.पी.ओ./प्रशांत केंद्रे, पी.ओ./भक्तेश सांगळे तसेच दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना मानव तस्करी किंवा अशा प्रकारच्या संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. सुरक्षित आणि मानव तस्करीमुक्त समाज घडविण्यासाठी विद्यार्थी, युवक आणि प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *