जि. संपादक अजित काळेल
सातारा : करजगी येथील चार वर्षीय निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अखेर फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवत न्यायालयाने कठोर आणि ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात उमदी पोलिसांनी केलेल्या झंझावाती तपासामुळे आरोपीच्या गुन्ह्याची एक-एक कडी उघड होत गेली आणि अखेर न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावत विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना कडक इशारा दिला.
घटना उघडकीस आल्यानंतर करजगीसह संपूर्ण परिसर संतापाने पेटून उठला होता. नागरिकांच्या भावना तीव्र झालेल्या असतानाच उमदी पोलिसांनी संयम, धैर्य आणि व्यावसायिक कौशल्याची कास धरत तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासी अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा जपून आरोपीविरुद्ध अभेद्य पुराव्यांची भक्कम भिंत उभी केली.
फॉरेन्सिक अहवाल, डॉग स्कॉडची मदत, अंगुलीमुद्रा तपास, डीएनए नमुने, वैद्यकीय पुरावे, पंचनामे आणि साक्षीदारांचे जबाब यांची प्रभावी साखळी तयार करत आरोपीला कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्याचा एकही मार्ग शिल्लक ठेवला गेला नाही. तपासातील अचूकता इतकी भक्कम होती की बचाव पक्षाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
विशेष म्हणजे, राज्यभर चर्चेत असलेल्या या संवेदनशील प्रकरणात अवघ्या १३ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून उमदी पोलिसांनी तपासातील वेग आणि गुणवत्ता यांचा आदर्श निर्माण केला. दुसरीकडे, वातावरण तापलेले असतानाही शांतता बैठका, मोहल्ला समित्या आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यातही यश मिळवले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत असून, “चिमुकलीला अखेर न्याय मिळाला” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात तपासी अधिकारी सुनील साळुंखे यांनी दाखवलेली तत्परता, चिकाटी आणि पुराव्यांवर आधारित तपास पद्धती ही महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
गुन्हा कितीही क्रूर असो, पुरावे आणि कायदा यांच्यापुढे गुन्हेगार टिकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. करजगीच्या चिमुकलीसाठी दिलेला हा न्याय केवळ एका कुटुंबाचा विजय नसून संपूर्ण समाजाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला बळ देणारा ठरला आहे.
