स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर  : शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची कत्तल करून लाखो रुपयांचा काळाबाजार करणाऱ्या आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत सर्वात मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत परभणी जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, हरियाणा राज्यातील इतर सहा सराईत गुन्हेगारा सोबत मिळून त्यांनी केलेल्या जनावर चोरीचे लातूर जिल्ह्यातील २४ आणि बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ असे एकूण ४१ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून २४,६८,०००/- इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे.
                  

लातूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर  यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अनेक दिवस तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन, संशयितांवर पाळत आणि विविध जिल्ह्यांमध्ये गोपनीय तपास करून या टोळीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.
                     

  दि. ०६ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा परिसरात जनावरे चोरी करणारे हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगारासह काही आरोपी व्यवहारासाठी जमले आहेत. माहितीची खातरजमा करून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी परिसराला वेढा घालताच आरोपींनी पिकअप वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून

१)अतिक सुलतान कुरेशी (रा. गंगाखेड) जिल्हा परभणी.

२) मुजाहिद बाबू खाटीक (रा. परभणी)

३)साजू गफार कुरेशी (रा. पालम जिल्हा परभणी) या तिघांना ताब्यात घेतले.

४) नियाज उर्फ महंमद नवाब (हरियाणा)

५) आस मोहम्मद सिरदार (हरियाणा)
               यांच्यासह इतर हरियाणा राज्यातील इतर चार साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
                     

प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विविध गुन्ह्यांतील तपशील समोर ठेवल्यानंतर आरोपींनी जनावरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींनी लातूर, बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमधून बैल, गायी, म्हशी, वासरे आदी जनावरे चोरी करून त्यांची कत्तल केली आणि मांस विक्रीतून लाखो रुपयांची कमाई केल्याचे कबूल केले.या चौकशीतून लातूर जिल्ह्यातील २४ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किनगाव, अहमदपूर, औसा, कारार शिरसी आदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील आणखी १७ जनावरे चोरीचे गुन्हे आरोपींनी कबूल केले असून संबंधित पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकाच कारवाईत तब्बल ४१ गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
                     

आरोपींकडून जप्त करण्यात आलेली २४,६८,०००/- इतकी रोकड ही जनावरे चोरी करून मांस विक्रीतून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रकमेचा पंचनामा करून ती विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आली आहे.या उल्लेखनीय कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून जनावरे चोरीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
                     

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या सूचना व निर्देशांवर तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर, यांच्या नेतृत्वातील पथकामधील सोबत सपोनि पांडुरंग माने, पोउपनि राजेश घाडगे, अमर केंद्रे,  पोलीस अमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सुर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, विजय पाटील, सिध्देश्वर मदने, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड,  राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, प्रेमदास राठोड, जमीर शेख, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, श्रीनिवास जांभळे यांनी अत्यंत धाडस, चिकाटी व कौशल्याने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *