स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर : सायबर जगतातील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन; अनैतिक मानवी व्यापाराविरोधात लातूर पोलिसांची जनजागृती.

                 लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. ०१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ या उपक्रमास संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना कायदे, सायबर गुन्हे, अमली पदार्थ, वाहतूक नियम, महिला व बालकांची सुरक्षा तसेच विविध सामाजिक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

                   याच अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, लातूर यांच्या वतीने लातूर शहरातील जिजामाता कन्या प्रशाळा तसेच श्री शिवाजी विद्यालय, लातूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अजित पाटील यांनी त्यांच्या पथकासह विद्यार्थ्यांना अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ याबाबत सविस्तर माहिती दिली.

*सोशल मीडियावरील मैत्री, आमिषे व खोटी आश्वासने यापासून सावध राहण्याचे आवाहन.*

                   मानवी तस्करी करणाऱ्या व्यक्तींकडून तरुणी, महिला तसेच बालकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून फसविले जाते. चांगल्या नोकरीचे, मोठ्या पगाराचे, परदेशात शिक्षणाचे किंवा लग्नाचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये अपहरण करून त्यांना इतर राज्यांमध्ये अथवा इतर ठिकाणी नेऊन त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण केले जाते.

                तसेच चुकीचे पासपोर्ट व व्हिसा तयार करून महिला, पुरुष व मुलांना बेकायदेशीर कामासाठी पाठविण्याचे प्रकारही घडत असतात. त्यामुळे अनधिकृत व्यक्तींवर विश्वास न ठेवणे, अनोळखी व्यक्तींकडून मिळणारी नोकरी किंवा परदेशात जाण्याची ऑफर पडताळून पाहणे आणि कोणत्याही संशयास्पद प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देणे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

                 सध्याच्या इंटरनेट व सोशल मीडिया युगात विद्यार्थ्यांनी विशेषतः मुलींनी आपली वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर, पत्ता, फोटो, लोकेशन, शैक्षणिक माहिती किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नये, तसेच सोशल मीडियावरून होणाऱ्या मैत्री व संपर्काबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

*लातूर कक्षाची उल्लेखनीय कामगिरी.*

               लातूर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षामध्ये नोडल अधिकारी श्रीमती भागीरथी पाटील (DySP), प्रभारी अधिकारी सपोनि श्री. अजित पाटील, तसेच दोन पोलीस अंमलदार व दोन महिला पोलीस अंमलदार कार्यरत आहेत.या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत अपहरणाचे ८० गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ अन्वये विविध ठिकाणी २२ छापे टाकून ४७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

                  विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहण्यासोबतच आपल्या मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणी किंवा परिचित व्यक्ती एखाद्या संशयास्पद व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. मानवी तस्करी ही केवळ कायद्याची बाब नसून महिला, बालक आणि युवकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर सामाजिक समस्या आहे. त्यामुळे अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने करण्यात आले.

                  लातूर पोलीस दलाचा ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रम केवळ विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देणारा उपक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संवाद साधावा व कोणत्याही प्रकारच्या आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन लातूर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *