स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता, सामाजिक उत्तरदायित्व आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 07 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील 13 शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन तब्बल 5052 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

              दि. 01 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांशी औपचारिक व्याख्यान न घेता संवादात्मक पद्धतीने चर्चा करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका, भीती आणि प्रश्न समजून घेत त्यांना कायद्याची माहिती, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षित जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढत असून, कायद्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे.

               आजच्या संवाद सत्रात ‘नशामुक्त भारत’ अभियान, नवीन फौजदारी कायदे, सायबर गुन्हे व त्यापासून बचाव, एनडीपीएस कायदा, पॉक्सो कायदा, वाहतूक नियम, हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून संवादात सहभाग नोंदविला.

                   या उपक्रमांतर्गत गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील महात्मा फुले प्राथमिक शाळेत पोउपनि. श्रीमती रायपल्ले यांनी मार्गदर्शन केले. तसेच गणेश माध्यमिक विद्यालय आणि व्यंकटेश विद्यालय येथे सपोनि. श्री. करे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

                 शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील राजा नारायण इंग्लिश स्कूल येथे सपोनि. श्री. तिडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीतील कृपासदन इंग्लिश स्कूल येथे पोउपनि. श्री. पुरी यांनी, तर शिवाजी विद्यालयात अवैध मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून महत्त्वपूर्ण माहिती दिली.

                लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जय किसान विद्यालय, गंगापूर येथे पोउपनि. श्री. वऱ्हाडे, भादा पोलीस ठाणे हद्दीतील कोहिनूर इंग्लिश स्कूल येथे सपोनि. श्री. शहाने, उदगीर शहर पोलीस ठाणे हद्दीतील हावगीस्वामी महाविद्यालय येथे पोउपनि. श्री. रेडेकर, अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीतील जय हिंद स्कूल येथे सपोनि. श्री. केदासे, तसेच वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत पोउपनि. श्री. हालसे यांनी, पोलीस स्टेशन देवणी हद्दीमध्ये आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांनी, तर पोलीस स्टेशन औसा येथे NSB अजीम विद्यालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घायवत यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

               पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे हे या उपक्रमाचा नियमित आढावा घेत असून, विद्यार्थ्यांशी होणारा प्रत्येक संवाद हा केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न राहता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, कायद्याबद्दल आदर निर्माण करण्यास आणि समाजात जबाबदार नागरिक घडविण्यास हातभार लावणारा ठरावा, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आगामी काळातही अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये अशाच संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोलीस प्रशासन पोहोचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *