स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासोबतच पोलीस दलाबद्दल विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी लातूर पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून दि. १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत दि. १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमध्ये तब्बल १२५ भेटी देण्यात आल्या असून ३९,५०९ विद्यार्थ्यांशी पोलिसांनी थेट संवाद साधला आहे.
या संवादातून विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती, वैयक्तिक सुरक्षितता, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर तसेच अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनीही पोलिसांशी मनमोकळेपणाने संवाद साधत विविध प्रश्न उपस्थित केले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः तीन ठिकाणी भेट देऊन तब्बल ७,८५० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
दि. १८ ऑगस्ट रोजी अहमदपूर येथे आयोजित पोलीस–विद्यार्थी संवाद मेळाव्यास पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रायबोले यांनीही संवाद साधला.

शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे हद्दीतील अनंतपाळ नूतन विद्यालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर श्री. मायने तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कासार शिरशी पोलीस ठाणे हद्दीतील राजाबाई धानोरकर विद्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गर्जे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील जिल्हा परिषद शाळा, नळेगाव येथे पोलीस उपनिरीक्षक श्री. चामले यांनी मार्गदर्शन केले.

औसा पोलीस ठाणे हद्दीतील मुक्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस निरीक्षक श्री. ढमाळे, गातेगाव हद्दीतील नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गढवे, रेणापूर हद्दीतील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस निरीक्षक श्री. देढे, तर लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील व्यंकटराव देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस उपनिरीक्षक श्री. वीरपक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना पोलिसांकडे मदतीसाठी विश्वासाने पाहता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ‘पोलीस तुमचे मित्र आहेत’ हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यासोबतच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर व सामाजिक बाबींची जाणीव करून देण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम आगामी काळातही सुरू राहणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला लातूर पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
