नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
मो.नं.7028192140
पाटस : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावची ओळख असलेल्या ऐतिहासिक नागनाथ तलावाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. मार्च महिना सुरू होताच कडक उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी आटले असून, दुसरीकडे तलावाच्या पात्रात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे या जलस्त्रोताचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली जाते, मात्र यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तलावाने तळ गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने तलाव कोरडा पडत चालला आहे.
तलावाच्या नैसर्गिक पात्रात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर बांधकामे आणि शेड्स उभी राहिली आहेत. तलावाच्या अगदी कडेला सिमेंटची भिंत, पत्र्याची शेड्स आणि व्यावसायिक गाळे उभे राहत आहेत. यामुळे तलावाचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस आकुंचन पावत आहे. याकडे महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. जर वेळीच अतिक्रमण काढले नाही आणि तलावाचे खोलीकरण केले नाही, तर भविष्यात पाटसकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.


