नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
मो.नं. : 7028192140
केडगाव | : शासनाकडून जमिनीचा मोबदला उकळायचा आणि पुन्हा त्याच जागेवर डल्ला मारायचा, असा दुहेरी फायदा घेण्याचा प्रकार केडगाव-चौफुला रस्त्यावरील बोरिपार्धी हद्दीत उघडकीस आला आहे. खडकवासला कालव्याच्या जमिनीवर काही धनदांडग्या दुकानदारांनी उघडपणे अतिक्रमण केले असून, या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे चित्र दिसत आहे.


बोरिपार्धी हद्दीतील गट नं. २३९/१ मध्ये हा सर्व प्रकार सुरू आहे. यापूर्वी रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी शासनाने येथील जागामालकांना रीतसर नुकसान भरपाई दिली आहे. म्हणजेच ती जागा आता सरकारी मालकीची आहे. मात्र, तरीही काही स्थानिक दुकानदारांनी या जागेवर आणि थेट कालव्याच्या कडेला बांधकाम साहित्य, सिमेंट पाईप्स आणि कचरा टाकून अतिक्रमण केले आहे.


कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक फेकला जात आहे. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह तर बाधित होतच आहे, पण त्यासोबतच हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला वापरल्या जाणाऱ्या खडकवासला कालव्याच्या शुद्ध पाण्याला प्रदूषणाचा विळखा बसत आहे. कालव्याच्या भिंतींना तडे जातील अशा पद्धतीने तिथे भरावा टाकला जात आहे.
रस्त्यावर उघडपणे हे अतिक्रमण सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग का घेत आहेत? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. जागामालकांनी आधीच पैसे उकळलेले असताना पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण करण्याची हिंमत त्यांना मिळतेच कशी? यामागे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ साटलोटं तर नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का? की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हे अतिक्रमण हटवले जाणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






