नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
मो.नं.7028192140
प्रशासकीय यंत्रणा सुस्त; गुंड प्रवृत्तीच्या दबावामुळे निर्भीड पत्रकारितेवर टाच आणण्याचा प्रकार
पाटस (प्रतिनिधी) : येथील गाव तलावावर बेकायदेशीर डल्ला मारणाऱ्या अतिक्रमणधारकांनी आता आपला मोर्चा सत्य मांडणाऱ्या पत्रकारांकडे वळवला आहे. तलावावरील अतिक्रमणाचे वाभाडे काढणाऱ्या पत्रकारांवर राजकीय पुढाऱ्यांचे नावे सांगून दबाव टाकण्याचा आणि धमकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “माझ्याकडे मोठे पद आहे,” अशी बतावणी करत आरपीआय (RPI) गटाच्या एका मोठ्या नेत्याचे नाव वापरून पत्रकारांची लेखणी रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून केला जात आहे.
अमोल तांदळे या एका सामान्य हॉटेल व्यावसायिकाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना ‘साम-दाम-दंड-भेद’ वापरून गप्प करण्याचा प्रयत्न होत आहे. तलावाच्या जागेवर अतिक्रमण करून शासकीय मालमत्तेची लूट करणाऱ्या या प्रवृत्तींनी आता थेट पत्रकारांनाच लक्ष्य केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, जर हे लोक पत्रकारांना धमकावू शकतात, तर त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना किती दबावाखाली ठेवले असेल?
स्वतःचे काळे कारनामे लपवण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे घेणे ही या अतिक्रमणधारकांची नवी ढब बनली आहे. मात्र, पक्ष किंवा नेत्यांच्या नावाखाली चालणारी ही ‘दंडुकेशाही’ पाटसकर आता खपवून घेणार नाहीत, असा सूर उमटत आहे. पत्रकारांवर दबाव टाकून सत्य दाबता येईल, हा संबंधितांचा भ्रम असून या प्रकरणाचा पाठपुरावा अधिक तीव्र केला जाणार आहे.
या प्रकरणातील दोषी अतिक्रमणधारकांवर आणि पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तींवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही ‘मक्तेदारी’ मोडून काढावी, अन्यथा पत्रकार संघटना आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.
