नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
मो.नं. : 70281 92140
दौंड (पुणे) दौंड तालुक्यातील केडगाव-वखारी येथील ग्रामदैवत हजरत पीर साहेब यांच्या वार्षिक यात्रेला यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम पाहायला मिळाला.
यात्रेच्या निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. धार्मिक विधी आणि चादर अर्पण करून यात्रेची विधिवत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि “पीर साहेब की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यात्रेतील विशेष आकर्षण म्हणजे पद्मश्री पुरस्कार प्राप्त लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली आणि पारंपारिक कलेचा मनमुराद आनंद लुटला.
तसेच यात्रेनिमित्त पार पडणारा इंगळा हा धार्मिक कार्यक्रमही भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय ठरला. हजारो भाविकांनी अग्नीकुंडातून चालत जात आपली श्रद्धा व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे वातावरणात आध्यात्मिक उर्जा आणि भक्तीची प्रचिती मिळाली.

यात्रेमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली असून विविध दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्टेशनरी तसेच पाळणे यामुळे परिसर गजबजून गेला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यात्रेचा आनंद लुटला.
पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडली.
केडगाव-वखारी येथील हजरत पीर साहेबांची यात्रा ही भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली.
