स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
धाराशिव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाला पाहून दगडफेक करून घटनास्थळावरून पसार झालेल्या टोळीचा अखेर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यात एकूण १० आरोपी निष्पन्न झाले आहेत.
दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता, आरोपींनी पोलिसांना पाहून पोलिस पथकावर दगडफेक केली आणि घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २८३/२०२६ अन्वये BNS मधील कलम ३३०(८), ३३०(४), २२३, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळाची पाहणी केली असता आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले होते. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
दरम्यान, दि. ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. या कारवाईदरम्यान रामा उर्फ बेल्या शंकर काळे (वय २३) आणि सरदार शंकर काळे (वय २८), दोघेही रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, यांना कन्हेरवाडी शिवारातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी इतर साथीदारांसोबत मिळून सदर गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानंतर तपासात या गुन्ह्यातील एकूण १० आरोपी निष्पन्न झाले आहेत. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक अहवालासह त्यांना वाशी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस कर्मचारी शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोह नागनाथ गुरव आणि पोह रणदीप डोंगरे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा टाकण्याचा प्रयत्न उधळला गेल्यानंतर आता संपूर्ण टोळीचा छडा लावण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
