नेताजी खराडे (  क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )

मो.नं. : 70281 92140

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल प्लाजा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टोल प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप करत संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी दिलेल्या निवेदनानंतरही कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना टोल प्रशासनावर थेट निशाणा साधला. “पाटस टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून प्रशासन ‘तोंड बघून’ काम करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. काही निवडक वाहनांना टोलमाफी दिली जाते, तर सर्वसामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
      टोल नाक्यावर गुंडागर्दीचे प्रकार वाढले असून वाहनचालकांवर मारहाणीच्या घटना घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ऑनलाइन टोल वसुली प्रणाली सुरू असतानाही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे ॲम्बुलन्स, शालेय बस आणि इतर अत्यावश्यक सेवांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
      विशेष म्हणजे, सोलापूर महामार्ग हा पालखी मार्ग असूनही पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि दिंड्यांना टोलमाफी दिली जात नसल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय टोल परिसरात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही निदर्शनास आले आहे. बसथांब्यांची कमतरता, अस्वच्छ शौचालये, अपूर्ण सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट्स नसणे, टोल फ्री नंबर बंद असणे, तक्रार पुस्तिका उपलब्ध नसणे आणि पारदर्शकतेचा पूर्ण अभाव या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
      या पार्श्वभूमीवर पाटस परिसरातील नागरिकांना सरसकट टोलमाफी द्यावी आणि टोल प्रशासनाने सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास पुढील काही दिवसांत चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस टोल प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा कडक इशारा अविनाश मोहिते यांनी दिला आहे.
   पाटस टोलवरील या वादामुळे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *