जि. संपादक अजित काळेल
बेवनूर : ( जिल्हा सातारा )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेवनूर येथे गुणवंत विद्यार्थी आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तथा नुकतीच मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेल्या मा. श्री. तानाजी जनार्दन शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच बारावी परीक्षा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि जिल्हा परिषद गुणवत्ता शोध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त महसूल उपायुक्त मा. श्री. रामचंद्र तातोबा शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता मा. श्री. शंकरराव जनार्दन शिंदे, केंद्रप्रमुख मा. श्री. कैलास गायकवाड, ज्येष्ठ नागरिक श्री. नानासाहेब बापू शिंदे, माजी सरपंच श्री. नानासो नामदेव शिंदे तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. विश्वासराव देशमुख उपस्थित होते.

बारावी परीक्षेत सुजल रणजित जमदाडे याने नीट परीक्षेत ५१७ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. सानिका आनंदराव शिंदे हिने जेईईमध्ये ९३.७० टक्के आणि सीईटीमध्ये ९८.३५ पर्सेंटाइल मिळवले, तर अनिकेत शामराव शिंदे याने सीईटीमध्ये ९९.६१ पर्सेंटाइल मिळवत चमकदार कामगिरी केली. ज्योती भारत देशमुख हिने ९६ टक्के गुण मिळवून यशाची परंपरा कायम राखली.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्वानंदी संतोष पवार हिने २०४ गुण मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली, तसेच पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत २५२ गुण मिळवले. वरद केशव शिंदे (२०४/२३८), श्लोक रणजित जमदाडे (१७६/२१८), स्वरा काकासो पवार (१५०/२२४) आणि प्रगती नेताजी पवार (१४६/१९०) यांनीही उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढविला.

जिल्हा परिषद गुणवत्ता शोध परीक्षेत गार्गी धनाजी शिंदे हिने ९८ गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय, तालुक्यात द्वितीय आणि वाळेखिंडी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तिच्या या यशाचे विशेष कौतुक करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवरांनी परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा. श्री. नितीन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. धनाजी नानासो शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. महादेव शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री. ईश्वर कुंभार, श्री. अमित शिंदे, श्री. शिवाजीराव रामचंद्र शिंदे, सौ. वर्षा गायकवाड आणि सौ. गज्जाक्का गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
