लातूर : ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमातून विद्यार्थिनींना महिला सुरक्षितता, स्वयंरक्षण व सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन.

                  लातूर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता, सुरक्षितता आणि पोलिसांशी संवाद वाढविण्यासाठी ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडून शाळा व महाविद्यालयांना नियमित भेटी देऊन विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधण्यात येत आहे.

                     याच उपक्रमाच्या अनुषंगाने दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दयानंद कला महाविद्यालय , लातूर येथे हर्षदा जोशी पुराणिक लिखित ‘स्त्री स्वयंरक्षणार्थाय : एक पाऊल सजगतेकडे’ या पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सुमारे ३५० विद्यार्थिनींशी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी संवाद साधत महिला सुरक्षितता, स्वयंरक्षण आणि सोशल मीडिया वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

                 सध्याच्या बदलत्या परिस्थितीत मुलींना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत असून, विशेषतः इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना छोटीशी चूकदेखील भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते, याबाबत पोलीस अधीक्षकांनी उदाहरणांसह विद्यार्थिनींना समजावून सांगितले.

                 सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत, अनोळखी व्यक्तींशी अनावश्यक चॅटिंग करू नये, स्वतःची वैयक्तिक माहिती किंवा छायाचित्रे कोणासोबतही शेअर करू नयेत, तसेच नोकरी अथवा इतर कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असा सल्ला त्यांनी दिला. सोशल मीडियावरील छायाचित्रांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक किंवा मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर हा जबाबदारीने आणि पूर्ण सजगतेने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

                  यावेळी विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एका संवेदनशील विषयावरही पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन केले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्याआधी पुरेशी समज नसताना भावनिक निर्णय घेऊन घरातून निघून जाण्यामुळे संबंधित मुलीसह तिच्या आई-वडिलांनाही मोठ्या मानसिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आई-वडिलांनी शिक्षणासाठी ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करावा, शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि भविष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना पालकांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

                 शिक्षण घेत असताना कोणत्याही विद्यार्थिनीला अडचण आली, कोणी त्रास दिला किंवा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर घाबरून न जाता डायल ११२, जवळचे पोलीस ठाणे अथवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी आपल्या अडचणी न घाबरता पोलिसांसमोर मांडाव्यात; त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव तत्पर आहे, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी दिला.

                     दरम्यान, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि धैर्य निर्माण करून त्यांना सुरक्षितपणे पुढे जाण्यास प्रेरणा देणारे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखिका हर्षदा जोशी पुराणिक यांचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

                 लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जनजागृती, संवाद आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *