स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
मौजे विरमाडे येथे विद्युत प्रवाहाचा धक्का बसून माकडाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यजीवाचा मृत्यू झाल्यानंतरही संबंधित वनपाल घटनास्थळी उपस्थित नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्याने वाई वनविभागातील भुईंज वन परिमंडळातील वनपालाच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
विरमाडे येथे माकडाचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, भुईंज वनपरिमंडळाच्या वनपाल वीर घटनास्थळी आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, वन्यजीव मृत्यूची घटना संवेदनशील मानली जाते. अशा घटनांमध्ये मृत वन्यजीवाची पाहणी, पंचनामा, आवश्यक कार्यवाही आणि मृत्यूचे कारण याबाबत वनविभागाकडून प्रक्रिया केली जाते. त्यामुळे संबंधित वनपाल जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित का राहिले नाहीत, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेची माहिती ग्रामस्थ आणि पत्रकारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता रेड्डी पाटील यांनाही दिल्याचे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवर माहिती देऊनही संबंधित वनपाल घटनास्थळी पोहोचल्या नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

कार्यालयीन उपस्थितीचाही मुद्दा चर्चेत
विरमाडे येथील घटनेनंतर भुईंज वनपरिमंडळ कार्यालयाच्या नियमित कामकाजाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कार्यालय आठवड्यातून मर्यादित दिवस आणि उशिरा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. याची प्रत्यक्ष चौकशी करून क्षेत्रीय व कार्यालयीन उपस्थिती व कामकाजाचा अहवाल जनतेसमोर आणावा,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
वन्यजीव संरक्षणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर योजना आणि उपक्रम राबविले जात असताना प्रत्यक्ष घटनास्थळी अधिकारी उपलब्ध नसतील, तर या यंत्रणेचा नागरिकांना कितपत फायदा होणार, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
उपवनसंरक्षकांकडून दखल घेण्याची अपेक्षा
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभाग, वृक्षसंवर्धन आणि वनसंवर्धनाच्या विविध उपक्रमांना चालना मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरमाडे येथील घटनेची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेऊन संबंधित वनपालची भूमिका तपासावी, दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात वनविभागाची अधिकृत बाजू काय आहे, संबंधित वनपाल घटनास्थळी का उपस्थित राहू शकल्या नाहीत आणि माकडाच्या मृत्यूबाबत नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, वनपाल वीर यांच्यावर्ती काय व कोणती कारवाई होणार? याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही होत आहे.
